माझी वाटचाल

संतपरंपरा, भारतीय संस्कृती आणि समाजाशी ज्ञान-विचारांच्या माध्यमातून जोडले जाण्याची ओढ.

कीर्तनाकडे वळण्याची प्रेरणा

संतपरंपरेचा परिचय, भारतीय संस्कृतीविषयीची आस्था आणि समाजाशी ज्ञान-विचारांच्या माध्यमातून जोडले जाण्याची ओढ या भावनेतून माझी वाटचाल विविध क्षेत्रांत घडत गेली.

श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या कीर्तन शिबिराच्या समारोपातील कीर्तनसेवा पाहण्याचा योग आला आणि त्या वेळी मनात कीर्तन करण्याची प्रेरणा जागृत झाली. समर्थकृपेने निर्माण झालेली ही इच्छा पुढे साधना आणि अभ्यासाच्या मार्गाने आकार घेत गेली.

७ ऑगस्ट २०१६ रोजी, नागपंचमीच्या दिवशी, श्रीराम मंदिर, भांगरवाडी, लोणावळा येथे माझ्या पहिल्या कीर्तनसेवेचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नारदीय व रामदासी कीर्तन परंपरेचा अभ्यास आणि प्रशिक्षण आजतागायत सुरू आहे.

गेल्या दशकभरात महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विविध ठिकाणी ५० हून अधिक कीर्तनसेवा करण्याचा योग आला. या प्रवासासोबतच योग, अध्यापन, संस्कारवर्ग, गायन, वक्तृत्व, लेखन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधूनही कार्य करण्याची संधी लाभली.

माझी ओळख

माझ्या कार्याचा केंद्रबिंदू अध्यात्म, भारतीय संस्कृती, अध्यापन आणि समाजप्रबोधन हा आहे.

  • १२ हून अधिक वर्षांपासून योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत.
  • शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग, संगणक, व्यक्तिमत्त्वविकास, गायन व सादरीकरण यांविषयी मार्गदर्शन.
  • ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रातही ७ हून अधिक वर्षांचा अनुभव; सध्या स्वतंत्रपणे (Freelance) कार्यरत.

या विविध क्षेत्रांतील अनुभवामुळे अभ्यास, अभिव्यक्ती, अध्यापन आणि सर्जनशीलता यांचा संगम माझ्या कार्यात घडत गेला.

शिक्षण

शैक्षणिक प्रवास

  1. Bachelor of Computer Applications (B.C.A.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ · २०१३–२०१५
  2. Certificate Course in Yoga (C.C.Y.)कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूट, लोणावळा · २०१२
  3. Diploma in Web & Graphic DesigningMegatron Animation Academy, पुणे · २०१५–२०१६
कार्यदृष्टी

माझी कार्यदृष्टी

भारतीय संस्कृतीचा वारसा केवळ जतन करून ठेवायचा नाही, तर तो नव्या पिढीच्या मनाशी जोडायचा — ही माझ्या कार्याची मध्यवर्ती प्रेरणा आहे. संतचरित्रे आणि संतवाङ्मय केवळ ग्रंथांच्या पानांमध्ये मर्यादित न राहता, त्यांतील विचार आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, अशी माझी इच्छा आहे.

कीर्तन, सत्संग, संस्कारवर्ग, लोककला, अध्यापन आणि विविध सामाजिक-आध्यात्मिक उपक्रमांच्या माध्यमातून बालक आणि तरुण पिढीमध्ये भारतीय संस्कृतीविषयी जिज्ञासा, आस्था आणि अभिमान निर्माण व्हावा, यासाठी काम करण्याची माझी मनापासून इच्छा आहे.

इतिहास, संतपरंपरा आणि भारतीय सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून त्यातील प्रेरणादायी पैलू समाजासमोर मांडणे, तसेच अधिकाधिक व्यक्तींना या परंपरेशी जोडणारे उपक्रम उभारणे, ही माझ्यापुढील वाटचालीची दिशा आहे.

ज्ञानातून विचार, संस्कारातून व्यक्तिमत्त्व, भक्तीतून अंतःकरण आणि सेवेतून समाजाशी नाते दृढ व्हावे.

कीर्तन, अध्यापन, योग, संस्कार आणि कला — या सर्व वाटा माझ्यासाठी स्वतंत्र नसून एका व्यापक ध्येयाकडे जाणाऱ्या विविध दिशा आहेत. गुरुजनांचे मार्गदर्शन, संतपरंपरेचा आशीर्वाद आणि समाजाचा स्नेह यांना सोबत घेऊन ही वाटचाल अधिक व्यापक करण्याची इच्छा आहे.

कार्यक्रमासाठी किंवा मार्गदर्शनासाठी संपर्क करा

कीर्तन, योग प्रशिक्षण, संस्कारवर्ग किंवा व्याख्यानाविषयी चौकशी पाठवा.